वेळ | कविता संग्रह | Read Here
Post by Lekhanimitraa
Pune
वेळ..
वेळ खूप ताकतवान असते
माणसाला माणसाची औकात
दाखवायची
ताकत वेळेत असते..
वेळ माणसाला जगायला शिकवते
स्वार्थीपणाचा माज केल्यावर
माणसाला होत्याचं नव्हतं
करून टाकते..
वेळ माणसाला माणूस बनवते
वेळ देऊनही धडा न घेणाऱ्याची
पुरती वाट लावण्याची
हिम्मत वेळेत असते..
वेळ माणसाला माणुसकी शिकवते
माणसाचा मी पणाचा घडा भरतो
भरलेला घडा फोडण्याचं
काम वेळ करते..
वेळ खूप काही शिकवते
झालं गेलं विसरून आयुष्यात
माणसाला पुढे चालायला
वेळच शिकवते..
वेळ माणसाला आधार देते
वेळ कठोर तितकीच दयाळू असते
वाईट वेळेला माणसाला
वेळ च रस्ता दाखवते..
-----------------------------------------
वेळ..
जीवनाला मिळालेली
एक अनमोल देणगी
म्हणजे वेळ..
विनामूल्य असूनही
मौल्यवान असलेली
एकमेव गोष्ट म्हणजे वेळ..
आयुष्यात पुढे घेऊन जाणारा
एक प्रामाणिक जोडीदार
म्हणजे वेळ..
आपल्याला आरसा दाखवणारा
आयुष्यातला एक
सच्या दोस्त म्हणजे वेळ..
आयुष्याची दशा अन् दिशा
ठरवणारं होकायंत्र
म्हणजे वेळ..
आयुष्यात सापशिडीचा अनुभव
चालता चालता देणारी
गोष्ट म्हणजे वेळ..
बरोबर ते बरोबर आणि चूक ते चूक
तिथल्या तिथे
आपल्यासमोर मांडणारी
गोष्ट म्हणजे वेळ..
-----------------------------------------
वेळ..
कधीकधी
बदलणाऱ्या वेळेचा
आपल्याला तिळमात्र ही
अंदाज येत नाही..
एकदा हातातून
निघून गेलेली वेळ
आयुष्यात
परत कधीच येत नाही..
कळत नकळत
हातातून एक एक
नात्याचे बंध
हळू हळू निसटून जातात..
वेळेसोबत
हरवलेली माणसे
मग शेवटीं
आयुष्यात आठवण मात्र उरतात..
आयुष्यात येणाऱ्या
वेळेआधीच
वेळेचा अंदाज बांधणारे
या छोट्याशा आयुष्यात नशीबवान ठरतात..
लेखणी मित्र
Facebook | Instagram | YouTube
Comments
Post a Comment