कविता संग्रह (संच) | 01. एक नातं | 02. मला तुझ्यासोबत जगायचं होतं | 03. जेव्हा तुझी आठवण येते

Post by Lekhanimitraa
Pune

एक नातं..

एक नातं
तुझ्या माझ्या प्रेमाचं
हे गुपित,
नव्हतं कधी उलगडायचं..
एक नातं
अतूट विश्वासाचं
ठरवलं होतं,
दोघांनीही ते निभवायचं..
एक नातं
नेहमीच बहरलेलं
देखावा नको,
हे मात्र ठरलेलं..
एक नातं
एकमेकांत गुंतलेलं
दोघांनीही ते,
मनापासून जपलेलं....
--------------------------------

मला तुझ्या सोबत जगायचं होतं..

मला तुझ्या सोबत जगायचं होतं
हातात हात घेऊन आयुष्यभर चालायचं होतं,
चालून चालून थकल्यावर
क्षणभर तुझ्याजवळ बसायचं होतं..

मला तुझ्या सोबत जगायचं होतं
तुझ्या सोबत आयुष्य घडवायचं होतं,
आपण एकत्र असताना
आयुष्याचं गणित तुझ्याकडून शिकायचं होतं..

मला तुझ्या सोबत जगायचं होतं
खरं प्रेम काय असतं हे जगाला दाखवायचं होतं,
कधी निर्णय चुकल्यावर
माझ्या पाठीशी उभा तुला पाहायचं होतं..

मला तुझ्या सोबत जगायचं होतं
तुझ्यासाठी जगासोबत लढायचं होतं,
ही लढाई जिंकल्यावर
आयुष्य तुझ्यासोबत जगायचं होतं..
--------------------------------

एक नातं..

एक नातं
कधीच संपलेलं..
एक नातं
एकमेकांपासून दुरावलेलं..
एक नातं
एकटं एकटं पडलेलं..
एक नातं
एकमेकांपासून
दूर असूनही
मनापासून निभावलेलं..
--------------------------------

जेव्हा तुझी आठवण येते..

जेव्हा तुझी आठवण येते
मन अगदी सुन्न होतं,
जुने दिवस आठवू लागतात
मन पाणी पाणी होतं..

जेव्हा तुझी आठवण येते
मन चार पावलं मागे जातं,
जुन्या आठवणी ताज्या होतात
मन अगदी शांत होतं..

जेव्हा तुझी आठवण येते
मन भूतकाळात जातं,
तुझी माझी भांडण आठवतात
मन अगदी प्रसन्न होतं..

जेव्हा तुझी आठवण येते
मन तुझ्यात रमत जातं
तुझं निस्वार्थ प्रेम आठवतं 
मन परत एकदा तुझ्या प्रेमात पडतं..

जेव्हा तुझी आठवण येते
मन तुझ्यात गुंतत जातं,
तू केलेले प्रॉमिस आठवतात
मग हसता-हसता रडायला येतं..

धन्यवाद
Team LekhaniMitra

Comments

लोकप्रिय पोस्ट

कविता संग्रह 002 | 01. नाते जपतांना | 02. शोध संपणार कधी? | 03. तू यावे आयुष्यात.. | 04. सुधारणार कधी?

मराठी स्टेटस | सुविचार | चित्र चारोळी | संग्रह (संच)

वेळ | कविता संग्रह | Read Here