मिनाक्षी

Post by
Lekhanimitra
    मिनाक्षी: एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मीनाक्षीचा "मिनी" ते "मिस वर्ल्ड मिनाक्षी" हा प्रवास

    एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मीनाक्षीचा "मिनी" ते "मिस वर्ल्ड मिनाक्षी" हा प्रवास या कथेतून मांडला आहे..

    गोरा रंग सडपातळ बांधा, सरळ नाक आणि काळेभोर टपोरे डोळे एकंदरीत एखाद्या नटीला ही लाजवेल अशी रेखीव शरीर रचना असलेली मिनाक्षी.
    अगदी साधारण जेमतेम कुटुंबात मिनाक्षीचा जन्म झाला. आई वडील पारंपरिक शेती करायचे. आर्थिक परिस्थिती हलाखीची होती.

    मीनाक्षीच्या वडिलांचे नाव गणोबा. अडाणी माणूस बोटावर हिशेब करता येईल एवढी त्याची शैक्षणिक ऐपत. कष्ट तर त्याच्या पाचवीलाच पुजलेले.
    गणोबा नेहमी म्हणायचा "कितीबी कष्ट करीन एक टाईमाला उपाशी राईन पण माया मिनीला मला मास्तरीन करायची हाय.

    गणोबाची परिस्थिती पाहता कर्जाचा बोजा डोक्यावर त्यात शेतीवर आडमाप खर्च झालेला. उत्पन्न एवढं की खर्च ही निघेल की नाही याची शाश्वती नाही. गनोबाजवळ आता कवडी ही शिल्लक नव्हती.
    मिनिला तर शाळेत घालायची आहे. गणोबा ची प्रचंड धडपड सुरू होती. याच्या त्याच्या पाया पडला मिनी ची फी भरायला शेजाऱ्याकडून हात उसने पैसे घेतले. मिनी चा शाळेत दाखला दिला.
    फी भरून उरलेल्या पैशात आठवडी बाजारातून मिनिसाठी गणवेष, खापराची पाटी आणि पेन्सिल चा पुडा घ्यायचा होता. पाटी,पेन्सिल आणि गणवेष याची किंमत पस्तीस रुपये आणि गनोबाकडची रक्कम पंचवीस यांचं गणित जुळता जुळत नव्हतं. घ्यावं तर सगळच लागणार होतं नाहीतर लेकरू हिरमुसेल.

    काय करावं त्याला सुचेना. जवळच त्याला मालगाडी ची रांग दिसली. आता त्यातला माल खाली करायचा असणार हे त्याला माहीत होत.
    मिनी चा गणवेष आणि पाटी घेण्यासाठी तेवढीच दोन पैशाची बेरीज म्हणून तो काम विचारायला गाडीजवळ गेला. काम भेटलं सिमेंट ची शंभर गोणी गाडीतून खाली उतरवल्या तेव्हा पंधरा रुपये भेटले. आता एकूण चाळीस रुपये त्याच्याजवळ आले होते.
    कामाच्या नादात कधी दिवस सरला आणि कधी बाजार संपून गेला त्याला कळलच नाही. आता मला पाटी भेटणार की नाही याच गणगणीत तो चालू लागला. एवढी धावपळ करुन पदरात निराशाच पडली. बाजार संपून गेला होता. जिवाचं रान करूनही मिनी ची पाटी आणि गणवेश त्याला घेता आला नाही.
    मिनी वाटेकडे डोळे लावून वाट पाहत बसली असेल आणि आपण खाली हाताने चाललो आहोत. मिनी चा हिरमुसलेला चेहरा आता त्याला त्याच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होता.

    इकडे मिनी ने सगळ्या मैत्रिणीला सांगून ठेवलेलं. "आज माझा बा बाजारातून माझ्यासाठी गणवेस आणणार हाय पाटी बी आणणार हाय"

    गणोबा घरी पोहोचला जरा झाकोळ पडलेला होता. बाप आलेला दिसताच मिनी आनंदून गेली होती. धावत धावत त्याच्या जवळ आली. हातातली पिशवी उचकली कुठेच पाटी दिसेना गणवेश दिसेना. तिने बापाकडे पाहिलं आणि बापाच्या गळ्यात पडली. एवढ्याश्या मिनी ने जणू बापाच्या डोळ्यात सर्व वाचलं होतं.

    गणोबा काही बोलणार तेवढ्यात मिनी हळूच कानात बोलली "बा मी पत्र्याची पाटी बनीली तुले दाखू? आणि पळत पळत अडगळीच्या खोलीत गेली. एक जुना चौरस पत्रा घेऊन जवळ आली. आणि म्हणाली "बा माही पाटी छान हे न?" मिनी ची समज पाहून गणोबाला अश्रू अनावर झाले होते. पत्र्याच्या पाटीवर तिने ने पुढचा आठवडा काढला. पुढच्या आठवडी बाजारातून मग गणोबाने मिनी साठी सगळ्या वस्तू आणल्या.

    मिनी शाळेत जाऊ लागली मग्न होऊन अभ्यास करू लागली. तिने वर्गात पहिला नंबर कधीच सोडला नाही. आतापर्यंत अनेक प्रकारची कौशल्ये तिने आत्मसात केली होती. बुद्धिमत्ता, भाषण कौशल्य, एकाग्रता, चिकाटी या सगळ्यांमध्ये ती अग्रणी होती.

    पहिली दुसरी करत करत मिनी सातवीत पोहोचली. मिनी चे चातुर्य, कला, बुद्धिमत्ता आणि गणिती कौशल्य यावर तिचे मास्तर ही भारावले होते. शालेय अभ्यासाव्यतिरिक्त घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा मास्तरांच्या सहकार्याने ती देत होती. प्रत्येक परीक्षेत कौतुकास्पद असं यश ती संपादन करत होती.

    मिनीने राज्यस्तरीय स्कॉलरशिप परीक्षा द्यावी अशी तिच्या मस्तरांची इच्छा होती. पण एवढा खर्च करण्याची ऐपत गानोबाची नव्हती. मिनीच्या मास्तरांनी तिचा सर्व खर्च स्विकारला तिला परीक्षेसाठी मुंबईला घेऊन गेले. परीक्षा झाली निकाल आले तिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.
    मिनी ला बक्षीस म्हणून स्कॉलरशिप मिळाली. यानंतर दहावी पर्यंतचा तिचा सर्व शैक्षणिक खर्च हे सरकार करणार होते.

    मुंबईमधील एका प्रतिष्ठित हायस्कूलमध्ये तिचे ॲडमिशन झाले. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मिनी तिच्या संभाषण कौशल्यामुळे ती सर्वांची लाडकी झाली होती.
    मिनाक्षी: एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मीनाक्षीचा "मिनी" ते "मिस वर्ल्ड मिनाक्षी" हा प्रवास

    परीक्षेचा एक एक पाडाव पूर्ण करत मिनी दहावी मध्ये पोहोचली. आपल्या परिस्थितीची तिला जाणीव होती. बापाच्या डोळ्यातलं पाणी तिला प्रोत्साहित करत होतं. जिद्दीने ती अभ्यास करू लागली.

    परीक्षा पार पडल्या निकाल आले इथेपण मिनीने नंबर मारला होता. मिनी मेरीट मध्ये आलेली होती. हे कळताच गणोबाचा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला होता...
    क्रमशः 

    Comments

    लोकप्रिय पोस्ट

    कविता संग्रह 002 | 01. नाते जपतांना | 02. शोध संपणार कधी? | 03. तू यावे आयुष्यात.. | 04. सुधारणार कधी?

    मराठी स्टेटस | सुविचार | चित्र चारोळी | संग्रह (संच)

    वेळ | कविता संग्रह | Read Here